समोसे आणी 'दी बोहरी किचन'
त्याने’ समोसा विकण्यासाठी Google मधील नोकरी सोडली.
देशातील अथवा जगातील मोठ्या कंपनीत काम करणे, हे आपल्या सर्वांचे स्वप्न असते. आणि हेच स्वप्न आपण ध्यानी ठेऊन आपण शिक्षण घेत असतो. त्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्या ड्रीम जॉबच्या शोधात असतो. तुम्हा-आम्हासारखा मुंबईचा मुनाफ कपाडिया हा युवक आपल्या ड्रीम जॉबच्या शोधात होता. त्यासाठी त्याने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. आणि त्याला Google या जगातील सर्वात मोठ्या कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
अशी संधी बरे कोण सोडेल? मुनाफनेही या संधीचे सोने केले. चांगले वेतन आणि नोकरीतील स्थिरतेमुळे त्याचे जीवन सुरळीत होते. दरम्यान, हौशी माणूस कधीही स्वस्थ बसत नाही, या संकल्पनेमुळे मुनाफला गुगलमधील नोकरीत काहीतरी कमतरता जाणवत होती. फावल्या वेळेमध्ये आपण आपल्यासाठी काही करु शकतो का, याचा विचार तो करु लागला.
आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर आल्यावर आपल्याला मार्ग सापडतोच. मुनाफनेही परिघापलिकडचा विचार केला. दरम्यान, आपल्या आईला निरनिराळे फूड शोज् पाहून नवनवीन पदार्थ करायला आवडतं, हे त्याने पाहिले होते. आपण या आधारित काही करु शकतो का, अशी कल्पना त्याच्या मनात आली.
आपल्या आईची मदत घेऊन मुनाफने फूड चेन सुरु करण्याचे ठरविले. त्यास ‘दी बोहरी किचन’ असे नाव दिले. बोहरी समाजात मिळणा-या चविष्ट आणि निरनिराळ्या डिशेसमुळे अल्पावधीतच या हॉटेलचे नाव सर्वदूर झाले. वेगवेगळे समोस्याचे प्रकार ही ‘दी बोहरी किचन’ची खासियत आहे. त्या जोडीला अनोखे कबाब आणि बिर्याणीवर तर खवय्ये आडवा हात मारतात.
काही वर्षातच ‘दी बोहरी किचन’ने फुड आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये चांगलाच जम बसवला. सध्या मुनाफच्या हॉटेलचा टर्नओव्हर 50 लाख आहे. भविष्यात त्याला हा ३ कोटींपर्यंत न्यायचा असल्याचे मुनाफने सांगितले. तसेच मुंबईमध्ये थाटलेल्या या हॉटेलचा बिझनेस त्याला दिल्ली, बंगळुरू आणि अमेरिकेतील न्युयॉर्कपर्यंत न्यायचा आहे. मुनाफ कपाडिया आणि त्याच्या आईच्या ‘दी बोहरी किचन’ या व्हेंचरने मुनाफला Forbes Under 30 list मध्ये जागा मिळवून दिली.
एक आयडिया आपले जीवन बदलू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मुनाफ कपाडिया यांचे ‘दी बोहरी किचन’!
Comments
Post a Comment