कोळंबी च्या रेसिपी
मासेप्रेमी असाल तर कोळंबी किंवा कोलंबी किंवा प्रॉन्स हा माश्याचा प्रसिद्ध प्रकार तुम्हाला नक्कीच आवडत असेल. कोळंबी हा मासा जे नेहमी नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी आणि ज्यांना झटपट माश्याची रेसिपी बनवायची असेल त्यांच्यासाठी पर्वणी आहे. कारण या माश्यात काटे नसतात. त्यामुळे खायला अगदी सोपा असतो. नव्याने मासांहार करण्याऱ्यासाठी या आहाराची ओळख कोळंबीने होऊ शकते. तसंच हा मासा बनवायलाही अगदी सोपा असतो. कारण कोळंबीच्या या कोळंबी फ्राय म्हणजे फक्त तिखट, मीठ, लसूण आणि कोकम लावून ते अगदी कोळंबी पुलावही करता येतो. पण फ्राय कोळंबी खाणे ही पर्वणी असते.
कोळंबीची कोणतीही रेसिपी बनवताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आधी साफ करणे. तसं तर बाजारातून आणलेला प्रत्येक मासा साफ करणे आवश्यकच असते. पण कोळंबी साफ करण्याची एक पद्धत आहे. जी तुम्ही कोळंबी प्रेमी असाल तर यायलाच पाहिजे. कारण कोळंबीचेही वेगवेगळे प्रकार आणि आकारात ती येते. जसं टायगर कोळंबी, खाडीतली कोळंबी आणि लाल कोळंबी. त्या त्या प्रकारानुसार ती साफ करावी लागते. मी खाली लाल कोळंबी जी बाजारात सहज मिळते आणि पटकन शिजते. ती साफ कशी करायची हे सांगणार आहे.
- सर्वात आधी कोळंबी बाजारातून आणल्यावर पाण्याखाली धरा. मग एका भांड्यात पाणी घेऊन त्यात कोळंबी काढा. कोळंबीवरील कवच काढणे महत्त्वाचे आहे. पण काहीजण कवचासकटही कोळंबी शिजवतात.
- जर तुम्हाला कवच काढायचे असेल तर शेपटी पकडून कवच काढा. आता कवच काढल्यानंतर कोळंबीचा दोरा काढणे महत्त्वाचे आहे. कोळंबीचा दोरा म्हणजे तिच्या पोटातील घाण काढून टाकणे. तो दोरा काढण्यासाठी कोळंबीला एक चीर द्या आणि सुरीच्या टोकाने किंवा टुथपिकच्या साहाय्याने हा दोरा काढून टाका.
- कोळंबी खायला जेवढा लागत नाही तेवढा वेळ ती साफ करण्यासाठी लागतो. हे काम सोपे असले तरी थोडे कटकटीचे वाटू शकते. पण कोळंबीची चव आठवा आणि ती पटापट साफ करून घ्या.
कोळंबीच्या झटपट रेसिपीज:
कोळंबीच्या रेसिपीजमध्ये कोळंबी फ्राय, कोळंबी भात म्हणजेच पुलाव, कोळंबी मसाला, कोळंबीच सुकं, कोळंबीची चटणी, कोळंबीचं लोणचं, कोळंबी 65 चायनीज प्रकार, कोळंबी भजी, कोळंबी तंदूर, कोळंबीची आमटी किंवा कढी, कोळंबी बिर्याणी, कोळंबी कालवण, कोळंबी मसाला फ्राय, केरळा पद्धतीची कोळंबी आणि कोळंबी कांदा-लसूण मसाला अशा विविध कोळंबी रेसिपीजचा समावेश आहे. त्यापैकी निवडक आणि झटपट होणाऱ्या रेसिपीज येथे शेअर करत आहे. कारण मला स्वतःला झटपट रेसिपीजच आवडतात.
1. कोळंबी फ्राय
कोळंबी फ्राय ही रेसिपी प्रत्येक कोकणी घरात आवर्जून केली जाते. कोळंबीपासून केला जाणारा हा सुका आणि चमचमीत प्रकार करणे फारच सोपे आहे व खाणे त्याहूनही सोपे आहे.
साहित्य:
स्वच्छ केलेली लाल कोळंबी, तिखट, हळद, लसूण पेस्ट, मीठ, तांदूळाचे पीठ, तेल, आमसुल किंवा कोकम आगळ.
कृती:
- एका भांड्यात कोळंबी घेऊन त्यामध्ये हळद, तिखट, मीठ, लसूण पेस्ट घालून एकत्र केला. तुम्हाला आवडत असल्यास ठेचलेला लसूणही वापरू शकता. त्याचा स्वाद अप्रतिम येतो.
- त्यामध्ये कोकमचा तुकडा किंवा आगळ घाला. एक फ्राय पॅन घेऊन त्यामध्ये तेल घ्या.
- मॅरिनेट केलेली कोळंबी तांदूळाच्या पिठीत घोळवून किंवा या मिश्रणात कालवून ती थेट तव्यावर फ्राय करण्यासाठी ठेवा.
- एक बाजू चांगली शिजली की, मगच कोळंबी दुसऱ्या बाजूला परतून घ्या.
- कोळंबी छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करा.
- मस्तपैकी गरमागरम तांदळाची भाकरी किंवा वाफाळत्या भाताबरोबर ही कोळंबी नक्की ट्राय करा.
2. कोळंबी भात
जर तुम्हाला कोळंबीची वनमील डिश हवी असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. कोळंबीचा चमचमीत भात म्हणजे स्वर्गसुख आहे आणि झटपट होतो. हे जास्त महत्त्वाचं आहे.
साहित्य:
एक वाटी लाल कोळंबी, आलं-लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, अख्खा खडा मसाला- तमाल पत्र किंवा गरम मसालाही वापरू शकता. तेल, मीठ, तयार फिश मसाला.
कृती:
- कोळंबी भात हा कुकरमध्ये पटकन होतो. या भातासाठी तुम्ही बिर्यानी तांदूळ, तुकडा तांदूळ किंवा जाडा तांदूळही वापरू शकता.
- सर्वात आधी कुकरमध्ये फोडणीसाठी तेल गरम करुन त्यामध्ये अख्खा खडा मसाला घालून छान परतून घ्या. नंतर त्यात कांदा, आलं-लसूण पेस्ट घाला. छान परतून घ्या आणि मग कोळंबी घाला. कोळंबी फ्राय करून घ्या.
- तांदूळ आधीच धुवून ठेवा. यात घालण्यासाठी एकीकडे तांदळाच्या प्रमाणानुसार पाणीही गरम करत ठेवा.
- कोळंबी थोडीशी फ्राय झाल्यावर त्यात तांदूळ घालून चांगल मिक्स करून घ्या. नंतर गरम पाणी त्यात घालून पुन्हा एकजीव करा.
- कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून कुकरची शिट्टी पडल्यावर गरमागरम कोळंबी भात वाढा.
- यासोबत तुम्ही साधं कांदा-टोमॅटो रायतं किंवा सोलकढी असं कॉम्बिनेशन करू शकता.
3. कोळंबीची भजी
कोळंबी फ्राय किंवा कोळंबी मसाला खायचा कंटाळा आला असल्यास कोळंबी भजी नक्की करून पाहा.
साहित्य:
दोन वाट्या छोटी कोळंबी, तांदुळाचे पीठ, बेसन, हळद, तिखट, आलं-लसूण पेस्ट, मीठ, तळण्यासाठी तेल
कृती:
- नेहमी करतो तशा भजीप्रमाणेच तुम्हाला याचे बॅटरही बनवायचे आहे.
- कोळंबीला मीठ,हळद, तिखट, आलं-लसूण पेस्ट लावून घ्या. मग त्यात तांदूळाची पीठी आणि त्याहून कमी बेसन घालून परत मिक्स करा.
- तांदूळाच्या पीठीमुळे भजी कुरकुरीत होते. जी चवीला छान लागते. आता आवश्यकता वाटल्यास पाण्याचा एक हात लावून भजीचे बॅटर तयार करुन घ्या.
- तेल व्यवस्थित तापल्यावर भजी तळायला घ्या.
- भजी छान कुरकुरीत तळून घ्या आणि मस्तपैकी हिरवी चटणी किंवा शेजवान चटणीसोबत त्यांचा आस्वाद घ्या.
तर अशा या कोळंबीच्या झटपट रेसिपीज तुम्हाला नक्की आवडतील, अशी आशा करतो.
Comments
Post a Comment