जुन्या काळातील रस्ते.

चाके जोडलेल्या वाहनांचा सर्रास व सर्वत्र उपयोग चालू होण्यापूर्वीच्या काळात माणसांच्या वर्दळीने तयार झालेल्या 'पायवाटा' किंवा 'पाऊलवाटा' हे प्रवास आणि दळणवळणाचे एक साधन होते. जुन्या काळात वाहन, पादचारी अथवा प्रवासी यांना एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी जाण्याच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेले जमिनीवरील रस्ते म्हणजे मार्ग होतेच. रस्ते हे वेगवेगळ्या जनसमूहांतील दळणवळणाचे प्राथमिक व प्रधान साधन आहे, असे म्हणावे लागेल. आधुनिक 'हमरस्ता प्रणाली' ही एक प्राचीन रस्ता प्रणालीच्या नैसर्गिक वाढीतूनच निर्माण झालेली आहे.

भारतातील रस्त्यांचा इतिहास खूप मोठा व रंजक आहे. त्यामुळे जुन्या काळात प्रवासासाठी किंवा वाहतुकीसाठी रस्त्यांचा विकास कसकसा होत गेला? लोक त्याचा वापर कसा करत? याची सविस्तर माहिती घेणे आवश्यक ठरते.

दळणवळण/प्रवासासाठीच्या रस्त्यांचा इतिहास व विकास-

अगदी प्राचीन काळातील व्यापाराचा विचार केला तर असे दिसून येते की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सिंधू संस्कृतीच्या काळापासूनच भारतीय मालाची निर्यात होत असे. त्याचे शेकडो पुरावे उत्खननातून मिळाले आहेत.

भारतातील रस्ते वाहतुकीचा/दळणवळणाचा इतिहास भारतीय संस्कृतीइतकाच जुना आहे. आर्य लोक हिंदुस्थानात 5000 वर्षांपूर्वी आले. त्यावेळी येथील मूळ रहिवाश्यांना पक्क्या रस्त्यांवरून लाकडी चाकांची वाहने वापरणे माहीत होते. इ.स.पू. 1500 च्या सुमारास आर्य लोकांनी गंगा-यमुना खोऱ्‍यातून बंगालच्या उपसागरापर्यंत कुरुक्षेत्र, हस्तिनापूर, कौशाम्बी, विदेह, काशी, मथुरा, अयोध्या, प्रयाग इ. शहरांना जोडणारा मार्ग दळणवळणासाठी/प्रवासासाठी तयार केला होता. वैदिक काळातही भारतात चांगले रस्ते होते असे वेदांतील 'महापथ' वगैरे उल्लेखांवरून दिसते. वैदिक वाङ्मयावरून दोन्ही बाजूंना वृक्षराजी असलेले रस्ते शहरे व खेड्यांपर्यंत होते, असे लक्षात येते. 'अथर्ववेदात' चाकाच्या वाहनांसाठी रस्ते तयार करताना काय काळजी घेतली पाहिजे, याचा उल्लेख आहे.

रामायणात सैन्याच्या हालचालींसाठी रस्ते बनवणे व ते दुरुस्त करणे, यासाठी खास विभाग ठेवावे लागत असत, असे म्हटले आहे. भारताचा चीन, इराण वगैरे शेजारच्या देशांशी जो व्यापार चालत असे, तोही जुन्या काळच्या रस्त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. बुद्धकाळात राजगृह, मगध, वैशाली, श्रावस्ती, उज्जैन या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांवरून माल व उतारू यांची बरीच वाहतूक होत असे. पुढे मौर्यांनी सिंधू ते ब्रह्मपुत्रापर्यंत व हिमालयापासून ते विंध्य पर्वतापर्यंत असे आपले एकछत्री साम्राज्य स्थापन केले. त्यांच्या कारकीर्दीत व्यापाराचीही बरीच वाढ झाली होती. साम्राज्याचे ऐक्य टिकविण्यासाठी उत्तम रस्त्यांची आवश्यकता आहे, हे त्यांनी ओळखले होते. त्यांनी अनेक राजमार्ग बांधून ते सुस्थितीत ठेवण्याकडे विशेष लक्ष पुरविले, असे मेगॅस्थिनीस व कौटिल्य यांनी नमूद केले आहे.

त्याकाळी पाटलीपुत्र (आताचे पाटणा) या राजधानीपासून चारी दिशांना चांगले रस्ते बांधण्यात आलेले होते व त्यांचा वापर करण्यासाठी नियमही तयार केले होते. सम्राट अशोक व चंद्रगुप्त यांच्या काळी पाणपोया, धर्मशाळा, सावलीसाठी लावलेली वृक्षराजी त्यांच्या सोयी असलेल्या हमरस्त्यांची उदाहरणे जुन्या ग्रंथांत आढळतात. मौर्यांचा महाराजमार्ग हिमालयाच्या सीमेपाशी सुरू होऊन, तक्षशिलेतून पुढे पंजाबातील पाच नद्यांवरून नंतर यमुना नदीच्या कडेने प्रयागपर्यंत गेलेला होता.

प्रवासासाठीच्या मार्गांचे स्वरूप-

चंद्रगुप्त मौर्यांच्या काळी रस्त्यांची बांधणी व देखभाल करण्याचे काम स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सोपविलेले होते. 'कौटिलीय अर्थशास्त्र' या ग्रंथात रस्ते कसे बांधावेत, याबद्दल सूचना आहेत.

त्याचप्रमाणे रथांचे मार्ग, बंदराकडे जाणारे मार्ग, आसपासच्या राज्यांना जोडणारे मार्ग यांचा उल्लेख आहे. रथांचे मार्ग 2·3 मीटर रुंद व इतर रस्ते सर्वसाधारणपणे 7.3 मीटर रुंद असत. लष्करी छावण्यांकडे जाणारे रस्ते याच्या दुप्पट असत. केवळ माणसे व लहान पाळीव जनावरे त्यांच्यासाठी 1.2 मीटर रुंदीचे रस्ते असत.

रस्त्यांच्या कडेला ठराविक अंतरावर 'अंतरदर्शक दगड' व 'दिशांचे खांब' रोवण्याची पद्धत तेव्हाही अमलात होती. सध्याचा राष्ट्रीय महामार्ग क्र. 1 चा (ग्रँड ट्रंक रोडचा) काही भाग हा वायव्य प्रांत पाटलिपुत्राला जोडणाऱ्या पूर्वीच्या रस्त्यावरच बांधला गेला आहे.

उत्तर व पश्चिम भारतात इ.स.पू. 300 ते 150 या काळात चांगल्या प्रकारे बांधलेल्या रस्त्यांचे जाळे होते. दक्षिणेतही मद्रास व रामेश्वरम् यांदरम्यान प्राचीन काळी एक सुसज्ज राजपथ वापरात होता. पुरातत्वीय व ऐतिहासिक पुराव्यांवरून असे दिसून येते की, इ. स. 75 पावेतो भारतातील लोकांना रस्तेबांधणीच्या अनेक पद्धती ज्ञात होत्या. यांत विटांची फरसबंदी, दगडांची फरसबंदी तसेच आधारस्तराकरिता वा रस्त्याच्या प्रत्यक्ष पृष्ठभागाकरिता वापरावयाचे एक प्रकारचे काँक्रीट/जिप्सम, चुना वा बिट्युमेन यांचा वापर करून भेगा बुजविणे, यांचा समावेश होता. इसवी सनाच्या प्रारंभी भारतात रस्त्यांना 'फरसबंदी' करण्याची पद्धत सर्वसाधारण प्रचारात होती व निचऱ्‍याची तत्वे चांगली माहीत होती. रस्त्याच्या कडांपेक्षा मधला भाग उंच करण्याची पद्धत आणि कडेचे खड्डे व गटारे यांचा उपयोग शहरांत प्रचलित होता.


तिसऱ्‍या ते पाचव्या शतकांत गुप्तांचे साम्राज्य उत्तर भारतात होते. इ. स. 401 ते 411 च्या दरम्यान भारतात आलेल्या फाहियान या चिनी प्रवाशाने तत्कालीन रस्त्यांचे वर्णन केलेले आहे. उज्जैनीत ईशान्य, पश्चिम व दक्षिण या दिशांकडून रस्ते आलेले होते. ह्यूएनत्संग यांनी सातव्या शतकाच्या सुरुवातीस भारतात असलेल्या चांगल्या रस्त्यांचे वर्णन केले आहे. राजे हर्षवर्धन हे आपल्या साम्राज्यात स्वतः फिरून रस्ते चांगले ठेवण्यावर देखरेख करीत असत. चौदाव्या शतकात इब्न बतूता या अरबी प्रवाशांनी भारतात प्रवास केला. त्यावेळी रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या झाडांचे वर्णन त्यांनी केले आहे.

सोळाव्या शतकाच्या मध्यास शेरशहा यांनी रस्त्यांची स्थिती सुधारून नवीन रस्तेही बांधले. रस्त्यांवर अंतर दाखविणारे दगड त्यांनी बसविले व प्रवाशांच्या सोयीसाठी 1700 सराया बांधल्या. त्यांनी आग्रा ते जोधपूर व चितोड, लाहोर ते मुलतान असे 24 महामार्ग देशातील महत्वाच्या शहरांना जोडण्यासाठी बांधले. याचा उल्लेख 'तारिख-इ-शेर शाही' व 'चहार गुलशन' या ग्रंथांत आढळतो.

जुन्या काळातील ऐतिहासिक ग्रँट ट्रंक रोड

(चित्रस्रोत: युलीन मॅगझीन)

लाहोरपासून पश्चिम बंगालमधील सुनरगावपर्यंत अनेक सराया व फलवृक्षराजी यांनी युक्त असलेला राजमार्ग सुप्रसिद्ध होता. 'सडक-इ -आझम' हा पूर्वेकडून वायव्येकडे जाणारा राजमार्ग 'शेरशहा' याने दुरुस्त केला होता. सोळाव्या ते अठराव्या शतकांत मोगल साम्राज्याचा अंमल जवळजवळ भारतभर होता. आपल्या दूरच्या सुभ्यांवर ताबा ठेवण्यासाठी मोगल राजांना चांगल्या रस्त्यांची आवश्यकता होती. यासाठी त्यांनी पक्के रस्ते बांधले व त्यांमधील बहुतेक आजही वापरात आहेत. अकबराने उत्तर भारत व दख्खन प्रांत यांना जोडणारा रस्ता सातपुड्यातून बुऱ्हाणपूर मार्गे बांधला. त्यानंतर औरंगजेबानेही बरेच रस्ते बांधले.

दक्षिण भारतात इसवी सनाच्या प्रारंभी सातवाहन राजांनी चांगले रस्ते बांधले होते. उज्जैनहून प्रतिष्ठानमार्गे (पैठण) कांची व मदुराईला जाणारा रस्ता होता. सातव्या शतकातील चालुक्य व पल्लव राजांनी आणि नवव्या शतकात चोल राजांनी रस्त्यांकडे विशेष लक्ष दिले. सोळाव्या शतकातील विजयानगर साम्राज्यातही रस्त्यांची स्थिती चांगली होती.

ब्रिटिश काळातील मार्ग-

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सतराव्या शतकाच्या प्रारंभी भारतात आली, तेव्हा पूर्वीचे रस्ते अगदी मोडकळीस आले होते. कंपनीने रस्त्यांची दुरुस्ती वा बांधणी यांकडे लक्ष दिले नाही. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस दळणवळणाचे मार्ग अतिशय वाईट स्थितीत होते. कंपनीचे लक्ष फक्त सैन्यासाठी बराकी व रस्ते बनविण्याकडे होते. सर्वसामान्य रस्त्यांची गरज त्या वेळच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाणवली नाही.

इ.स.1828 नंतर विल्यम बेंटिंक यांनी रस्तेबांधणीचा कार्यक्रम, मुख्यतः सैन्याच्या हालचालींना उपयुक्त होण्यासाठी हाती घेतला. त्यांनी मुंबई-आग्रा रस्ता सुरू केला. लॉर्ड जेम्स डलहौसीने भारतातील रस्ते विशेष प्रमाणात बांधले. कलकत्ता ते पेशावर हा रस्ता त्यांनी सुस्थितीत आणला. रस्त्यांची कामे लष्करी मंडळे पहात. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस देशाच्या निरनिराळ्या भागांना जोडणारे हमरस्ते अस्तित्वात आले.

प्रवासासाठी विविध साधनांचा/प्राण्यांचा वापर-

रेल्वे येईपर्यंत भारतात जमिनीवरील प्रवास बहुधा पायीच करावा लागे किंवा घोडे, बैल, उंट, हत्ती, गाढवे यासारख्या प्राण्यांचा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अथवा मालवाहतुकीसाठी उपयोग करावा लागे. पालख्या, मेणे व डोल्या यांतून काही लोक प्रवास करीत, तर काही टांग्यांतून जात. बैलगाड्यांचाही सर्रास उपयोग करण्यात येई. अवजड सामान प्राण्यांच्या पाठीवरून नेले जाई व मौल्यवान वस्तूंची वाहतूक बैलगाड्यांमधून होत असे.

'सार्थवाह' आणि सशस्त्र रक्षकांसह प्रवास-

पैठण ते उत्तरेतील मथुरा व आताच्या दक्षिणेकडील आंध्रप्रदेशातील अमरावती तसेच वायव्येला तक्षशिला ते पूर्वेकडील बंगालमधील ताम्रलिप्ती असे 'महामार्ग' तयार झाले होते. या मार्गांवरून व्यापारी तांड्यांना सोबत घेऊन 'सार्थवाह' प्रवास करत असत. त्यांच्यासोबत सशस्त्र रक्षक असत. जेणेकरून लुटमारीपासून संरक्षण मिळत असे.

व्यापारी वर्गांबरोबर पर्यटक, भिक्षुक तसेच तिर्थक्षेत्रांसाठी अनेक लोक प्रवास करत असत. त्यांच्या सोयीसाठी छोट्या व्यापारी पेठा महत्वाच्या ठरत. मथुरेकडे बरेच लोक देवाधर्मासाठी जात असत. म्हणून रोमन लोकांनी या नगरीचे नाव Theopolis म्हणजेच 'देवतांची नगरी' असे ठेवले होते. अशा प्रवासी लोकांमुळे व व्यापारी मार्गांमुळे मोठी शहरे व असंख्य खेडी एकमेकांना जोडली गेली होती.

(चित्रस्रोत: स्लाइड शेअर)

महाराष्ट्रातील रस्ते-

भारताचा प्राचीन व्यापार ग्रीस, इटली, पर्शिया, इजिप्त व रोम तसेच मध्य आशियातील देशांबरोबर होता. अनेक बंदरे आणि त्यांना जोडणाऱ्या घाटवाटांमुळे हा व्यापार होऊ शकला. यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील बंदरे व शहरे यांचा फार मोठा संबंध होता. हे सर्व 'सार्थवाह' पथांनी जोडले होते. त्यांचे जणू जाळेच निर्माण झाले होते.

घाटमाथ्यावरील बाजारपेठांमध्ये तयार होणारा माल वेगवेगळ्या मार्गांनी सह्याद्रीची रांग ओलांडून कोकणातील बंदरात आणला जात असे. सातवाहनांच्या काळात महाराष्ट्रातील सर्व रस्ते पैठण या त्यांच्या राजधानीकडे व जुन्नर आणि तेर याठिकाणी असणाऱ्या पेठांकडे जात असत. महाराष्ट्रातून उत्तरेकडे जाणारे रस्ते नर्मदेच्या उतारांवरून विंध्य पर्वत ओलांडून उज्जैनकडे जात असत.

नकाशांवर लेण्यांची स्थाने मांडावीत व रेघा ओढून ती जोडावीत. म्हणजे जोडलेल्या रेघांवरून रहदारीचे मार्ग दिसून येतात. उदा. थळघाट, नाणेघाट व बोरघाटावरुन कल्याण व पनवेल बंदरांकडे वाहतूक होत असे.

निष्कर्ष-

पूर्वीच्या काळात लांब प्रवासासाठी केवळ 'पायवाट' अथवा 'पाऊलवाट' हाच मार्ग अस्तित्वात नव्हता तर रुंद असे इतर मार्गही होते. प्रवासी वाटा किंवा व्यापारी वाटा बहुतांश वेळा घनदाट जंगलातून, वेगवेगळ्या घाटातून, दऱ्याखोऱ्यातून, नदीच्या काठांवरून जात असत. या ठिकाणी प्रवास करताना मार्गदर्शन अत्यंत आवश्यक असे. सार्थवाहांना ह्या वाटांची इत्यंभूत माहिती असल्याने त्यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरत असे. सार्थवाहांना तांड्यांच्या वस्तीची ठिकाणे, पाण्याचे साठे, विश्रांतीसाठी लेणी यांचे विशेष ज्ञान असे.


Comments

Popular posts from this blog

कोळंबी च्या रेसिपी

मुंबई मधील मराठी माणूस

बिटकॉइन चे फायदे आणि तोटे.